Unknown person dead: गोंदिया–बल्लारशहा पॅसेंजरमध्ये अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत!

Bhairav Diwase


मूल:- गोंदिया–बल्लारशहा पॅसेंजर ट्रेन नेहमीप्रमाणे आज मूल रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पाऊणे सात वाजताच्या दरम्यान दाखल झाली. प्रवासी उतरत असताना एका कोचमध्ये एक अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत दिसला. माहिती मिळताच स्टेशन मास्टर यांनी तत्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून मूल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला.

सूचना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पथकासह रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागत होती. दरम्यान प्रवाशांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्येही हलचल निर्माण झाली होती.

याचदरम्यान शहरातील प्रसिद्ध समाजसेवक संदीप आगडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता आपली कॅम्पर गाडी स्टेशनवर बोलावली. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह अत्यंत सन्मानाने गाडीत ठेवून उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आला.

संदीप आगडे यांनी दाखविलेल्या सामाजिक जाणिवेची व तत्पर सेवाभावी वृत्तीची शहरात मोठी चर्चा असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. अनेकांनी “अशा संवेदनशील प्रसंगी मदतीचा हात पुढे करणे हेच खऱ्या अर्थाने समाजकार्य” असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.