Bacchu Kadu: शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ; बच्चू कडू मैदानात!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हे आपण ऐकले आहे; पण कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागली, ही अमानवीय घटना नागभीड तालुक्यातील मिंथूरमध्ये घडली आहे.

मिंथूर येथील तरुण शेतकरी रोशन कुळे यांनी आपल्या दुग्ध व्यवसायासाठी एका अवैध सावकाराकडून केवळ १ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, व्याजाचा हा आकडा ७४ लाख रुपयांपर्यंत नेऊन सावकाराने त्यांचा छळ सुरू केला. या कर्जासाठी रोशन यांनी आपली शेती, ट्रॅक्टर आणि घरातील दोन मोटारसायकली सुद्धा विकल्या. तरीही सावकाराची भूक भागली नाही. अखेर, त्यांना कंबोडियाला जाऊन आपली किडनी विकण्यास भाग पाडण्यात आले.


या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी आज मिंथूर गावी जाऊन पीडित शेतकऱ्याची भेट घेतली. कुटुंबाची विचारपूस करताना कडू यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कडक ताशेरे ओढले. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील लोकांचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे की, ३ जानेवारी रोजी जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'मिंथूर ते नागभीड' असा भव्य पैदल लॉंगमार्च काढण्यात येईल. या माध्यमातून तहसीलदार आणि ठाणेदारांकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे.