Chandrapur News: घुग्घुस नगरपरिषद: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; कडक पोलीस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात

Bhairav Diwase

चंद्रपूर:- घुग्घुस या नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषदेसाठी आज ऐतिहासिक मतदान पार पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या निवडणुकीची प्रतीक्षा होती, त्या घुग्घुस नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी आज मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. यापूर्वी काही कारणास्तव ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात ही प्रक्रिया राबविली जात आहे. या निवडणुकीत सुमारे ३२ हजार पेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. घुग्घुसच्या या पहिल्या नगरपरिषदेत २२ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत आहे.


केवळ घुग्घुसच नव्हे, तर जिल्ह्यातील गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील काही महत्त्वाच्या प्रभागांमध्येही आज निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे.