चंद्रपूर:- नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने कठोर भूमिका घेतली असुन मा. न्यायालयाने सुमोटो जनहित याचिकेमधील २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार नायलॉन मांजाच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्देश दिले असून त्यानुषंगाने मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सर्व सामान्य जनतेस सार्वजनिक आवाहन करीत आहे.
सन २०२१ पासुन नायलॉन मांजावर बंदी असूनही प्रत्यक्षात फारसा बदल झालेला नाही. आजही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर सुरु असल्याने दरवर्षी अनेक नागरिक जखमी होत आहेत, तर काहींना जीवही गमवावा लागत आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
नायलॉन मांजाचा वापर करणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते बंदीबाबत नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार -
एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवतांना आढळल्यास, त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा दंड न्यायालयात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत,
प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवतांना आढळल्यास, त्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचा दंड न्यायालयात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत,
तसेच नायलॉन माजांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून साठा जप्त झाल्यास, प्रत्येक उल्लंघनासाठी न्यायालयात २ लाख ५० हजार रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत अशा कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नायलॉन मांजाचा वापर, खरेदी विक्री करु नये आणि जो कोणी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना किंवा साठवणुकदार आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील पोलीस हेल्पलाईन ११२ वर तात्काळ संपर्क करुन त्याबाबतची माहिती द्यावी.

