चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचे प्रकरण आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याकडे वळले आहे. सुरुवातीला केवळ कंबोडिया कनेक्शन वाटणाऱ्या या गुन्ह्यात आता भारतातील नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांची साखळी उघड झाली आहे.
चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणी क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि हिमांशु भारद्वाज यांना अटक केली. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हिमांशु भारद्वाज याने स्वतःची किडनी देखील याच रॅकेटमार्फत विकली होती.
किडनीची किंमत: ५० ते ८० लाख रुपये (रुग्णाकडून)
डॉ. रविंद्रपाल सिंग (दिल्ली): १० लाख रुपये
डॉ. राजरत्नम (त्रिची - तामिळनाडू): २० लाख रुपये
एजंट आणि इतर: २० लाख रुपये
किडनी देणारा (Donar): केवळ ५ ते ८ लाख रुपये
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) एक पथक सध्या तामिळनाडूच्या स्टॉर किम्स हॉस्पिटलमध्ये संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांच्या शोधात आहे. तर दुसऱ्या पथकाने दिल्लीतून डॉ. रविंद्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने डॉ. सिंग यांना २ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एका गरीब शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सुरू झालेला हा तपास आता देशातील मोठ्या किडनी प्रत्यारोपण घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहे. यात आणखी किती मोठी नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

