Chandrapur News: चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

Bhairav Diwase

उमेदवारी गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवारांना मोठा दणका
चंद्रपूर:- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर भाजपमध्ये अखेर मोठी शिस्तभंगाची कारवाई झाली असून चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने आज, ३१ डिसेंबर २०२५ रोजी कासनगोटूवार यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून त्यामध्ये आपणास आजपासून चंद्रपूर महानगर अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्राची प्रत विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनाही पाठवण्यात आली आहे.

ही कारवाई अचानक झालेली नसून काल चंद्रपूर महापालिकेतील उमेदवारी यादीवरून उडालेल्या अभूतपूर्व गोंधळाचा थेट परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्टपणे बोलले जात आहे. प्रदेश भाजपाने समन्वयातून अंतिम करून पाठवलेली उमेदवारांची यादी चंद्रपूरमध्ये अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आल्याचे गंभीर आरोप झाले होते.

 निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनंतरही तब्बल १४ उमेदवारांची नावे परस्पर वगळल्याचा आरोप पक्षांतर्गत पातळीवर प्रचंड संताप निर्माण करणारा ठरला होता.

भाजप म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन, अशी ओळख असतानाही चंद्रपूरमध्ये मात्र या तिन्ही गोष्टींना हरताळ फासण्यात आल्याचे चित्र समोर आले. प्रदेशाध्यक्ष, पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ प्रदेश नेत्यांनी समन्वयातून ठरवलेली यादी बाजूला सारून आपल्या मर्जीतील आणि विश्वासातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप झाला. यामुळे अनेक निष्ठावान, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते डावलले गेल्याची भावना तीव्र झाली आणि पक्षात उघड बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी युती-अघाड्यांमध्ये बिघाडीचे प्रकार घडत असले तरी चंद्रपूरमधील भाजपचा अंतर्गत गोंधळ सर्वाधिक चर्चेत राहिला. निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे जबाबदारी असतानाही त्यांनी एककल्ली कारभार केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्रभावी उमेदवारांची तिकिटे कापून त्यांना अपक्ष लढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही उघडपणे होत आहे. यामुळे भाजपच्या जागा कमी करण्याचा घाटच घातला जात असल्याची चर्चा पक्षात रंगली होती.

या पार्श्वभूमीवर नागपुरात सलग दोन दिवस वादळी बैठका झाल्यानंतर चंद्रपूर महापालिकेची उमेदवार यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ती अंतिम करून जाहीरही केली. मात्र या अंतिम यादीलाच चंद्रपूरमध्ये केराची टोपली दाखवत परस्पर बदल केल्याचा आरोप झाल्याने पक्षश्रेष्ठींची प्रतिमा आणि अधिकार थेट आव्हानात सापडले. याच प्रकरणाची पहिली मोठी किंमत म्हणून भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर सुभाष कासनगोटूवार यांची हकालपट्टी झाल्याचे मानले जात आहे.

कासनगोटूवार यांची हकालपट्टी ही केवळ संघटनात्मक कारवाई नसून आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठीही हा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण चंद्रपूरमधील उमेदवारी गोंधळाचा केंद्रबिंदू म्हणून जोरगेवार यांच्यावरच थेट बोट दाखवले जात होते. आता महानगर अध्यक्षपदाची हकालपट्टी झाल्याने पुढील कारवाईची सुई निरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार जोरगेवार यांच्याकडे वळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.