चंद्रपूर महापालिकेत भाजप आमदाराची मनमानी, पक्षात प्रचंड असंतोष
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन ही ओळख मानली जाते. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हीच शिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रदेश भाजपाने अंतिम करून पाठवलेली उमेदवारांची यादी चंद्रपूरमध्ये अक्षरशः केराची टोपली दाखवत बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनंतरही तब्बल १३ नावे परस्पर वगळल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे भाजपच्या चंद्रपूर शहर संघटनेत संतापाची लाट उसळली आहे.
प्रदेशातून आलेली यादी साधारणतः अंतिम मानली जाते. मात्र चंद्रपूरमध्ये ही परंपराच मोडीत काढण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ प्रदेश पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून तयार केलेली यादी डावलून, आपल्या मर्जीतील आणि विश्वासातील उमेदवारांना तिकीट मिळावी असा आरोप होऊ लागला आहे. यामुळे निष्ठावान, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः बाजूला फेकण्यात आल्याची भावना तीव्र झाली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीने पहिली यादी जारी करण्यात आली होती यानुसार या यादीमध्ये, प्रभाग क्रमांक १ मधील सौ. माया उईके, प्रभाग क्रमांक ३ मधील पूजा पोतराजे, प्रभाग क्रमांक ४ मधील अजय विमल सरकार प्रभाग ७ मधील मनीषा मिथुला महताब, प्रभाग ८ मधील सत्यम संजय गाणार, प्रभाग १० वार्ड मधील सौ. शुभांगी अनिल दिकोंडावार प्रभाग 11 मधील शितल मारुती कुलमेथे प्रभाग १२मधील वंदना ताराचंद्र भागवत प्रभाग १२ वार्ड ड मधील गणेश शंकर रामगुंडावार प्रभाग १३ सौ रेखा बबन दातारकर याच प्रभागातील वार्ड ड मधील कुणाल रमेश गुंडावार प्रभाग १४ वार्ड अ मधील सौ पंचशीला अनुप चिवंडे प्रभात १४ वार्ड मधील हरीश विजय मंचलवार यांची नावे जाहीर करण्यात आली होती ती नंतर गायब झाली आहेत.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीत ठिकठिकाणी बिघाडीचे चित्र दिसत असले, तरी चंद्रपूरमधील भाजपमधील अंतर्गत गोंधळ राज्यात सर्वाधिक चर्चेत आला आहे. चंद्रपूरमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांनी मनमानी निर्णय घेत असल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. त्यांच्या एककल्लीपणामुळे भाजपमध्ये रोष वाढत असून, निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्रभावी उमेदवारांची तिकिटे कापून त्यांना अपक्ष लढण्यास भाग पाडून भाजपच्या जागा कमी करण्याचा घाट घातल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागपुरात दोन दिवस चाललेल्या वादळी बैठकीनंतर चंद्रपूर महापालिकेची उमेदवार यादी अखेर प्रदेशाध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समन्वयातून अंतिम केलेली यादी जाहीर केली. मात्र या यादीलाच निवडणूक प्रमुख जोरगेवारांनी सरळ केराची टोपली दाखवत, परस्पर नावे गाळल्याचे आणि आपल्या मर्जीतील उमेदवारांना उमेदवारीची खैरात वाटल्याचे आरोप आता उघडपणे होत आहेत. शिस्तबद्धतेचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.
पक्ष नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष आणि निरीक्षकांच्या निर्णयांना डावलून झालेल्या या कथित मनमानीमुळे चंद्रपूर भाजपमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून पक्षाबाहेर काढण्याची मागणी उचलून धरली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयालाच न जुमानता उमेदवारी वाटप झाल्याचा हा प्रकार सध्या चंद्रपूरच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. ही मनमानी भाजपसाठी आत्मघातकी ठरणार का, बंडखोरीला खतपाणी घालणार का आणि पक्षश्रेष्ठी यावर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

