Chandrapur: चंद्रपूर भाजप शहराध्यक्षांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी; निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी
बुधवार, डिसेंबर ३१, २०२५
चंद्रपूर:- शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये चक्क प्रदेशाध्यक्षांनी फायनल केलेली उमेदवारांची यादी बदलण्याचे धाडस शहराध्यक्षांना महागात पडले आहे. चंद्रपूरचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली असून, या निर्णयाचे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची जी अधिकृत यादी अंतिम केली होती, त्या यादीत फेरफार करून कासनगोट्टुवार यांनी आपल्या पसंतीचे १० पेक्षा जास्त उमेदवार घुसडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान दिल्याने पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि कासनगोट्टुवार यांना तत्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे आदेश जारी केले.
कासनगोट्टुवार यांची वर्षभरापूर्वीच या पदावर नियुक्ती झाली होती, मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या निवडीला पक्षात अंतर्गत विरोध होता. त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होते. आज त्यांच्या हकालपट्टीची बातमी समजताच शहरातील तुकूम परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. "निष्ठावंतांचा विजय झाला" अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ऐन निवडणुकीच्या काळात शहराध्यक्षांची हकालपट्टी झाल्याने चंद्रपूर भाजपमध्ये आता नवे समीकरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

