चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील २१५ रिक्त पदांसाठी २० जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत जिल्हा पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी माहिती दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यावेळेस एकूण २१५ जागांसाठी ही भरती होत असून, यासाठी प्रशासनाकडे तब्बल २०,६८५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी साधारणपणे ९६ उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण मैदानी चाचणी चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालय, तुकुम या मैदानावर पार पडणार आहे. चाचणीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

