चंद्रपूर:- राजकारण म्हटलं की जय-पराजय आणि तिकीट वाटपावरून होणारी नाराजी हे समीकरण ठरलेलं असतं. मात्र, चंद्रपुरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राजकारणात केवळ सत्ता महत्त्वाची नसते, तर आपल्यासोबत चालणारा कार्यकर्ता किती महत्त्वाचा असतो, याचं उत्तम उदाहरण आमदार किशोर जोरगेवार यांनी घालून दिलं आहे.
निमित्त होतं महापालिका निवडणुकीचं! तिकीट वाटपात मनोज पोतराजे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. यामुळे पक्षाच्या निष्ठावंत आणि माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम या काहीशा निराश झाल्या होत्या. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात दाटून आली होती.
मात्र, ही नाराजी विद्रोहात बदलण्यापूर्वीच आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी कोणत्याही प्रोटोकॉलची वाट न पाहता स्वतः चंद्रकला सोयाम यांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांची समजूत काढली. "पद येत असतात आणि जात असतात, पण माणसं जोडणं आणि ती टिकवणं हीच आपली खरी संपत्ती आहे," असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

