Chandrapur BJP: उईके-अहीर-जोरगेवार त्रिकूट मैदानात!

Bhairav Diwase
चंद्रपूरच्या विकासासाठी महायुतीचा विजयाचा निर्धार
चंद्रपूर:- आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री ना. अशोक उईक, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध भागांत एकत्रित जाहीर सभा घेतल्या. बाबूपेठ, महाकाली कॉलरी आणि पठाणपूरा येथे झालेल्या या सभांना नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या सभांमधून तिन्ही नेत्यांनी महायुती एकजुटीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयी करणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपच्या प्रचाराला चांगले बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. अशोक उईके म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर सरकार सातत्याने काम करत आहे. या विकासकामांची गती कायम ठेवण्यासाठी महानगरपालिकेतही विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, भाजप हा केवळ निवडणूक जिंकणारा पक्ष नाही, तर सर्व समाजघटकांना न्याय देणारा पक्ष आहे. ओबीसी, आदिवासी, दलित, महिला आणि युवकांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा थेट लाभ तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप करत आहे. चंद्रपूर शहराचा विकास अधिक वेगाने व्हावा यासाठी महायुतीला मजबूत करणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून भाजपचा विजय सुनिश्चित करा, असे ते म्हणाले.


तर यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आज बाबूपेठ येथे ही सभा होत आहे. येथील जुनी मागणी असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचा विषय आपण मार्गी लावला असून या भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या भागातील नागरिकांना आता हक्काचे घरपट्टे मिळणार आहेत. अनेक विकासकामे या भागात प्रस्तावित असून त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


चंद्रपूर शहराचा विकास हा आमच्या सर्वांचा सामूहिक संकल्प आहे. बाबूपेठ, महाकाली कॉलरी आणि पठाणपूरा येथील सभांमध्ये नागरिकांनी दाखवलेला उत्साह हेच महायुतीच्या विजयाचे द्योतक आहे. पाणी, रस्ते, घरपट्टे, स्वच्छता, आरोग्य आणि रोजगार हे आमचे प्राधान्याचे विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व सभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.