चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तापला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, प्रभाग क्रमांक १२ मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते गणेश रामगुंडेवार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली असून, त्यांनी पक्षावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १२ मधून गणेश रामगुंडेवार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या अधिकृत यादीत त्यांचे नाव असतानाही, ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याचा दावा रामगुंडेवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी रक्ताचे पाणी केले, रात्रंदिवस संघटनेसाठी राबलो, पण पक्षनिष्ठेचे फळ हेच का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. प्रस्थापित नेत्यांनी आपली उमेदवारी षडयंत्र रचून कापल्याचा आरोप करत, त्यांनी आता जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मी प्रभाग १२ मधील जनतेच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवत आहे. माझ्यावर झालेला अन्याय हा केवळ माझा नाही, तर प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याचा अपमान आहे. मी कोणत्याही परिस्थितीत माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही.
गणेश रामगुंडेवार
अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक-१२

