Chandrapur News: ताडाळी ग्रामपंचायतीवर प्रशासनाचे 'बुलडोझर'; सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचे पद रद्द!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ताडाळी (ता. जि. चंद्रपूर) येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापरात आर्थिक अनियमितता झाल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच, उपसरपंच व संबंधित सदस्यांना पदावरून दूर करण्याचा आदेश नागपूर विभागाचे अपर आयुक्त यांनी दिला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


१५ व्या वित्त आयोग निधीच
सन २०२०-२१ अंतर्गत प्राप्त झालेला सुमारे ९५,५०० रुपयांचा निधी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून तात्पुरत्या उचल स्वरूपात खर्च करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. निधी खर्च करण्यापूर्वी आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आली नसल्याचे तसेच ग्रामसभेची योग्य मंजुरी नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानंतर अपर आयुक्त, नागपूर विभाग यांनी सुनावणी घेतली. गैरअर्जदारांचे म्हणणे व खुलासा ग्राह्य धरता येत नसल्याचे नमूद करत आर्थिक अनियमितता सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.


अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ताडाळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व संबंधित सदस्य यांना पुढील कालावधीसाठी पद धारण करण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचा अहवाल मान्य करण्यात आला आहे.


या निर्णयामुळे ताडाळी ग्रामपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.