नागभीड:- कष्टांनी पिकवलेलं धान… एका रात्रीत हिरावलं गेलं… ही केवळ चोरी नाही, तर ही आहे एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर केलेली घाला! चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावातून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. येथील शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांनी आपल्या कुटुंबासह अहोरात्र मेहनत करून धानाचे पीक उभे केले होते. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी दोन हात करत, कर्जाचा डोंगर उपसत त्यांनी हे पीक काढलं होतं. मात्र, काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या या मेहनतीवर पाणी फेरलं.
शेतात साठवून ठेवलेल्या एकूण ३४ पोत्यांपैकी तब्बल १२ पोती धानाची चोरट्यांनी मध्यरात्री लंपास केली. ही चोरी महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातून झाली आहे. सकाळी जेव्हा विश्वनाथ शेतात पोहोचले, तेव्हा रिकामी जागा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नागभीड तालुक्यात सध्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी विश्वनाथ सातपैसे यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
ही चोरी केवळ धान्याची नाही, तर एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, हीच आता चिंधीचक ग्रामस्थांची मागणी आहे.

