ज्येष्ठ पत्रकार अरुण मादेशवार यांचे अल्पशा आजाराने निधन
सिंदेवाही:- आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध प्रहार करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सिंदेवाही तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा 'चांदा न्यूज'चे संपादक अरुण मादेशवार (५५) यांचे आज पहाटे ३:३० वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. मागील महिनाभरापासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नागपूर येथील कीम किंग्सवे रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या जाण्याने केवळ पत्रकारिता क्षेत्राचीच नव्हे, तर सामाजिक चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अरुण मादेशवार हे केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता, अनेक सामाजिक चळवळींचे आधारस्तंभ होते. 'सोसायटी फॉर फास्ट जस्टीस'चे विदर्भ विभागीय सचिव आणि 'अँटी करप्शन तथा ट्रॅफिक वेल्फेअर अँड सेफ्टी फाऊंडेशन'चे विदर्भ झोनल प्रमुख म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आणि न्यायासाठी मोठा लढा दिला. गुंजेवाही येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. तसेच माता अंबिका ऐलम्मा देवस्थान कमिटीचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली सेवा अर्पण केली होती. अलिकडेच त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत लिजेंडरी पीस अवार्ड कौंसिल कडून त्यांना नवी दिल्लीत डायनॅमिक एक्सलन्स पुरस्कार २०२५ या डाक्टरेट ने सन्मानित देखील करण्यात आले होते.
अतिशय परखड, तत्त्वनिष्ठ आणि गोरगरिबांच्या हाकेला तात्काळ धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा आणि पदाचा सदैव सकारात्मक वापर केला. त्यांच्या निधनाने एका संघर्षशील आणि तत्त्वनिष्ठ वादळ शांत झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा आप्तपरिवार असून, त्यांच्या निधनामुळे मादेशवार कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आज दुपारनंतर त्यांच्या मुळगावी गुंजेवाही येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

