चंद्रपूर:- ज्यांनी आपल्याच पक्षातील उमेदवारांच्या यादीत घोटाळा केला आणि पक्षासोबत गद्दारी केली, ते आपल्याशी किती प्रामाणिक राहतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असा थेट हल्लाबोल काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपवर केला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संजयनगर, भानापेठ आणि तुकूम परिसरात आयोजित प्रचारसभांमध्ये त्या बोलत होत्या. महापालिकेत १० वर्षे सत्ता भोगल्यानंतरही जर रस्ते, पाणी आणि स्वच्छतेसारख्या समस्या कायम राहत असतील, तर अशा सत्ताधाऱ्यांचा काय फायदा? असा सवाल करत त्यांनी मतदारांना भाजपच्या अपयशाचा जाब विचारण्याचे आवाहन केले.
शहरातील 'अमृत' योजनेवर बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्राची 'अमृत' सारखी मोठी योजना शहरात आली खरी, पण ती केवळ कागदावरच राहिली. योजना अपूर्ण असताना आणि अनेक घरांपर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नसतानाही, केवळ 'टक्केवारी'च्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांची बिले काढून दिली. सर्वसामान्यांच्या पैशाचा हा अपव्यय असून भाजपला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही.
चंद्रपूरच्या पाणीप्रश्नावर बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भविष्यातील संकल्प मांडला. प्रस्तावित 'धानोरा बॅरेज' प्रकल्प मंजूर करून चंद्रपूर शहराला २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने नेहमीच निराधार नागरिकांना स्थायी घरे देण्याचे काम केले असून, संजयनगर ,एमइएल प्रभाग सारख्या भागातील नागरिकांच्या हक्कासाठी पक्ष सदैव खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रचारसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनीही केंद्र, राज्य आणि स्थानिक भाजप नेत्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. याप्रसंगी माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस सरचिटणीस विनोद दत्तात्रेय यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी सर्व नेत्यांनी एकमुखाने केले.

