चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली असून, सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. मात्र, सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती एका फोटोची! चंद्रपूरचे आमदार आणि भाजपचे निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. अनेक प्रभागांमध्ये जाहीर सभा आणि जनसंपर्क मोहिमांनी जोर धरला आहे. निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना जोरगेवार यांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. प्रचाराच्या या धबडग्यात वेळ वाचवण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी एका साध्या हॉटेलमध्ये बसून नाश्ता उरकला. कार्यकर्त्यांसोबत बसून नाश्ता करतानाचा हा फोटो सध्या सर्वत्र शेअर केला जात आहे. "जिथे मिळेल तिथे नाश्ता आणि जिथे वेळ मिळेल तिथे चर्चा," असा पवित्रा घेत आमदार जोरगेवार निवडणुकीच्या मैदानात फिरत आहेत.

