Vijay Wadettiwar : अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी 'एसआयटी' नेमा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- अवैध सावकारांच्या अमानवी पाशात अडकलेला शेतकरी रोशन कुळे याला त्याची किडनी विकावी लागली. पूर्व विदर्भातील अशा अनेक शेतकर्‍यांचा श्वास अद्यापही या सावकारांच्या विळख्याखाली कोंडला जात आहे. ज्यांनी रोशन कुळे याला किडनी विकायला भाग पाडले, त्या अवैध सावकारांना पाठीशी घालण्याचे काम काही राजकीय नेते करीत आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही. पण कुळे याच्यावर दबाव आणला जात आहे असा आरोप करीत, या अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने 'एसआयटी' नेमावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे केली.


रोशन कुळे याच्यामुळे देशातील किडनी विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांचा हा तपास आजघडीपर्यंत तरी योग्य दिशेने सुरू आहे. पण अवैध सावकारांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे. या सावकारांचे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. पाच-सहा सावकार मिळून कर्जबाजारी सावज हेरतात आणि त्याची जमिन आपल्या नावे करतात आणि ती परस्परांमध्ये विकतात आणि शेवटी बाहेरच्या व्यक्तीला विकून मोकळे होतात. त्यांनी लावलेला व्याजाचा दर एवढा जास्त असतो की, शेतकरी त्यांचे कर्ज कधीच फेडू शकत नाही. असा प्रकार केवळ चंद्रपूर जिल्ह्यात नाही, तर पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर सरकारने तातडीने आळा घातला पाहिजे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.