Vijay Wadettiwar : खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक होत नाही!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- खासदार झाले म्हणून कोणी जिल्ह्याचे मालक होत नाही. खा. प्रतिभा धानोरकर यांना पक्षात येऊन सहाच वर्ष झाली आहे. त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांना मीच पक्षात आणले होते. चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष कमकुवत होता, तेव्हा मोठ्या कष्टाने मी पक्षांची बांधणी केली. माझ्याच जिल्ह्यात कुणी मला ढवळाढवळ करू नये असे म्हणत असेल तर ते चालणार नाही. धानोरकर यांनी थोडा संयम बाळगावा, अशा शब्दात आमदार विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांना खडसावले.

ते पुढे म्हणाले, शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमदेवारी मिळावी म्हणून दिल्लीला गेलेल्या माझ्या काही समर्थकांची तिकीट खा. धानोरकर यांनी कापली. पण शेवटी आम्ही दोघांनी संयुक्त यादीवर स्वाक्षरी केली. सर्व नगरसेवक माझेच आहेत, असे त्या म्हणत असेल तर कसे चालेल. मी म्हणेल तसेच झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह पक्षश्रेष्ठीही मान्य करणार नाही. वैचारिक मतभेद असू शकतात, पण जुना इतिहास काढायला गेले, तर अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.


मागील 25 वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा मी सांभाळत आहे. प्रतिभा धानोरकर नवख्या आहेत. हा पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. नगरपरिषद निवडणुकीत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले धानोरकरांचा सहभाग नगण्या होता, असा आरोपही वडेट्टीवार यांनी लावला.


खा. धानोरकर यांचा गैरसमज झाला असावा. कुठल्याही नगरसेवकाला आम्ही जबरदस्तीने बोलावले नाही. नगरसेवक स्वतःहून आमच्याकडे आले. उलट धानोरकर यांनीच गाडीत बसवून आमच्या नगरसेवकांना नेले. एकत्र बसूनच चंद्रपूरचा महापौर ठरवायचा आहे, निर्णय नगरसेवक घेतील, नेते नाहीत, असेही ते म्हणाले. पक्ष सोडून जाण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण कार्यकर्ता जिवंत असेल तरच पक्ष जिवंत राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.