चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. चंद्रपूर महानगरपालिका गड जिंकल्यानंतर आता काँग्रेसमध्येच 'जुंपली' असल्याचं पाहायला मिळतंय. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका आणि आपले नगरसेवक पळवणं थांबवा," अशा शब्दांत धानोरकरांनी वडेट्टीवारांना सुनावलं आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह होता, पण हा उत्साह आता अंतर्गत वादात बदलला आहे. प्रतिभा धानोरकर यांचा आरोप आहे की, पक्षाचेच काही मोठे नेते त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांची पळवापळवी करत आहेत. नाव न घेता त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागली आहे.
काँग्रेसमधील या दोन बड्या नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवड जवळ येत असताना चंद्रपूर काँग्रेसमधील ही गटबाजी पक्षाला महागात पडणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
एककीकडे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असताना, दुसरीकडे स्वतःच्याच बालेकिल्ल्यात नेत्यांमधील हा संघर्ष आगामी काळात काय वळण घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

