Chandrapur News: ताडोबा बफर क्षेत्रातील भामडेलीत खळबळ; व्हिटॅमिनच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थी आजारी

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या भामडेली येथील जिल्हा परिषद शाळेत एका भयानक निष्काळजीपणामुळे १९ विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले होते. व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळेत दर आठवड्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र, काही आठवडे हा पुरवठा झाला नव्हता. बुधवारी एका विद्यार्थिनीने गोळ्यांची मागणी केली असता, संबंधित शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चक्क सहा-सहा गोळ्या देण्याचे आदेश दिले. शिक्षकांच्या सांगण्यावरून निरागस विद्यार्थ्यांनी या गोळ्यांचे सेवन केले आणि त्यानंतर काही वेळातच शाळेत गोंधळ उडाला. गोळ्या घेताच विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे आणि तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावली. सर्व १९ विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, तर इतरांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


आरोग्य प्रशासनाने दिलेल्या गोळ्यांचा असा चुकीचा वापर मुलांच्या जीवावर बेतू शकतो. या घटनेला जबाबदार असलेल्या शिक्षकांवर काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.