Attempt To Murder: गडचांदूरमधील 'अटेम्प्ट टू मर्डर'चा गुन्हा २४ तासांत उघड

Bhairav Diwase
कोरपना:-
गडचांदूर पोलीस हद्दीत एका इसमावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणला असून दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ५ मार्च २०२६ च्या रात्री अरविंद रोहणकर नामक व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत रोहणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम १०९ अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि गडचांदूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (LCB) आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कदम (गडचांदूर) यांच्या नेतृत्वातील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.