Chandrapur News: महिला दिनानिमित्त ‘Break The Taboo’ उपक्रम; आरंभ फाउंडेशनतर्फे सॅनिटरी नॅपकिन वितरण

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जागतिक महिला दिनानिमित्त समाजात मासिक पाळीबाबत असलेला संकोच व गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने “आरंभ फाउंडेशन” तर्फे ‘Break The Taboo’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम चंद्रपूर येथील गांधी चौक येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पार पडला.


“आरंभ फाउंडेशन”च्या पुढाकारातून हा उपक्रम “Wings of Hope Foundation” यांच्या सहकार्याने तसेच Max Hospital यांच्या सहसमर्थनाने आयोजित करण्यात आला. या उपक्रमात महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले तसेच मासिक पाळीविषयी आरोग्यदायी व सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.


समाजात आजही मासिक पाळी हा विषय उघडपणे बोलला जात नाही आणि त्याभोवती अनेक गैरसमज आहेत. या पार्श्वभूमीवर ‘Break The Taboo’ या मोहिमेद्वारे हा विषय सामान्य करण्याचा आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा संदेश देण्यात आला.


विशेष म्हणजे या उपक्रमात “आरंभ फाउंडेशन”चे सर्व स्वयंसेवक तरुण होते. त्यांनी पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला.


यावेळी “आरंभ फाउंडेशन”चे संस्थापक **चैतन्य सदाफळ** यांनी सांगितले की, समाजात काही विषयांबाबत अजूनही संकोच व मौन आहे. अशा विषयांवर खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आरंभ फाउंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.