Suicide News: चालत्या ट्रकखाली झोकून देऊन मजुराची आत्महत्या; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बल्लारपूर शहरात एका मजुराने धावत्या ट्रकखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही थरारक घटना घडली. भैरव खेदू ठाकूर, वय ४० वर्ष, असं मृत मजुराचं नाव आहे. भैरव हा मूळचा बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्याचा रहिवासी होता आणि पोटाची खळगी भरण्यासाठी तो महाराष्ट्रात आला होता. बल्लारपूरमध्ये सध्या SNDT महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे, याच ठिकाणी भैरव मजूर म्हणून काम करत होता.


सीसीटीव्हीमध्ये दिसल्याप्रमाणे, रस्त्यावरून एक ट्रक जात असताना अचानक हा मजूर धावत आला आणि त्याने थेट ट्रकच्या समोरच्या चाकाखाली उडी घेतली. काही समजण्याच्या आतच त्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मात्र, भररस्त्यात अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कोणत्या कारणातून भैरवने हे पाऊल उचललं, याचा तपास आता बल्लारपूर पोलीस करत आहेत.