बल्लारपूर:- घरगुती वादातून एका महिलेने वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१) उघडकीस आली. शीतल प्रशांत मुळे (३८, रा. सम्राट चौक, बालाजी वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सास्ती येथील शितल हिने पहिल्या पतीपासून विभक्त होत बल्लापुरातील प्रशांत मुळे याच्यासोबत २०२२ मध्ये विवाह केला होता. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे शीतल ही सास्ती येथे माहेरी राहत होती. शुक्रवारी (दि. २०) रात्री ती घरातून बाहेर निघाली. मात्र, परत आली नाही. माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यावरून घटनेची नोंद घेत पोलिसांनी संशयावरून वर्धा नदी परिसरात पाहणी केली. शनिवारी (दि. २१) दुपारी २ वाजेच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे करीत आहेत.

