Accident News: कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपला; डोळ्यात अश्रू, सहारे कुटुंबाने मांडली आपबीती!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सावली तालुक्यातील मोखाडा येथे एका भीषण अपघातात दुमाजी आनंदराव साहारे वय ३१ वर्षे या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला, मात्र या घटनेला अनेक दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला अद्याप त्या काळ बनून आलेल्या वाहनाचा शोध घेता आलेला नाही. या प्रकरणाला आता अवैध दारू तस्करीचे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या कुटुंबाने थेट पोलीस अधीक्षकांचे दार ठोठावले आहे.


सावली तालुक्यातील मौजा मोखाडा येथील रहिवासी दुमाजी आनंदराव साहारे वय ३१ वर्षे हे ६ मार्च २०२६ च्या रात्री रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की दुमाजी साहारे गंभीर जखमी झाले. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना ८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आज या घटनेला दोन आठवडे होत आले आहेत, पण गुन्हेगार मोकाट आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा अपघात झाला, तेव्हा गावात शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती आणि तिथे पोलीस बंदोबस्तही तैनात होता. मुख्य चौकात एवढी मोठी घटना घडूनही पोलीस प्रशासनाला त्या वाहनाचा मागोवा घेता येऊ नये, यावर आता कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, सदर वाहन हे सावलीतून गडचिरोलीत अवैध दारू पुरवठा करणाऱ्या माफियांचे असण्याची दाट शक्यता आहे.


आपल्या कुटुंबाचा आधार गमावलेल्या साहारे कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. कुटुंबाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन निष्पक्ष तपास करण्याची आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर स्थानिक पोलीस तपासात कुचराई करत असतील, तर विशेष तपास पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी आर्त हाक या कुटुंबाने दिली आहे.