भाजप नगरसेवकांचा स्वपक्षाच्या महापौरांविरोधातच निषेधार्थ आंदोलन!
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र असून, चक्क स्वपक्षाच्या महापौरांविरोधातच भाजप नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. आपल्याच मागणीला केराची टोपली दाखवल्याचा आरोप करत संतप्त नगरसेवकांनी आज महापालिकेत जोरदार ठिय्या आंदोलन केले.
चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. निमित्त आहे सभागृह नेतेपदाची नियुक्ती. भाजपच्या तब्बल २७ नगरसेवकांनी एकत्र येत शेखर शेट्टी यांची या पदावर वर्णी लावण्याची मागणी केली होती. तसे लेखी निवेदनही महापौरांना देण्यात आले होते. मात्र, बहुमताचा हा आकडा आणि नगरसेवकांची भावना लक्षात न घेता, महापौरांनी आपल्या स्वेच्छाधिकारात दुसऱ्याच नगरसेवकाची नियुक्ती केल्याने भाजपमध्ये असंतोषाचा स्फोट झाला आहे.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी ११ वाजल्यापासून भाजपचे नाराज नगरसेवक महापौर कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. विशेष म्हणजे, दुपारी ४ वाजेपर्यंत नगरसेवक महापौरांची वाट पाहत होते, पण महापौर कार्यालयात न फिरकल्याने नगरसेवकांच्या संतापात अधिकच भर पडली.
भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती असलेल्या या महापालिकेत अशाप्रकारे अंतर्गत वाद उफाळून आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. महापौरांनी घेतलेला हा निर्णय स्वमर्जीचा असून तो पक्षादेशाला धरून नसल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे.

