Police News: अनोखे 'एप्रिल फुल'! पोलीसांना मॉकड्रिलला बोलावले अन् थेट 'धुरंधर-२' चित्रपट दाखवला

Bhairav Diwase
परभणी:- बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता राखीव पोलिस निरीक्षक यांना मुख्यालयातील सर्व जवानांना उड्डाणपुलजवळ अनुसया चित्रपट गृहाजवळ त्वरित पाठवावे, असा संदेश अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी दिला. सर्व जवान वाहनाद्वारे त्वरित दाखल झाले. येथे आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण, ही मॉकड्रिलची एक चाचणी ठरली. प्रत्यक्षात याच जवानांना चित्रपटगृहात नेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी येथे आणल्याचे सांगितले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला तंतोतंत पाळणाऱ्या जवानांना आपण 'एप्रिल फुल' बनलो की काय, असे काही क्षण जाणवले.


विविध प्रकारच्या निवडणुका, सण, उत्सव यासह वेळोवेळी बंदोबस्ताची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिस मुख्यालयातील सर्व जवानांना विरंगुळा मिळावा, यासाठी हा अनोखा प्रयोग राबविण्यात आला. कुठलाही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नव्हता. केवळ सर्वांना वेळेवर सूचना आल्यानंतर यंत्रणा सजग आहे की नाही, हे तपासण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी कर्मचाऱ्यांचे स्वागत करून त्यांना धुरंधर -२ हा चित्रपट दाखविला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.