चंद्रपूर:- वरोरा-भद्रावतीचे भाजप आमदार करण देवतळे यांनी आपल्या पत्नीसह सफारी करताना चक्क मोबाईलचा वापर केला आणि त्याचे 'रिल्स' बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले. ताडोबात वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी कोअर आणि बफर क्षेत्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. तरीही आमदारांच्या या रीलमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल स्पष्टपणे दिसत असून त्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या वादावर पडदा टाकण्यासाठी आमदार करण देवतळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा व्हिडिओ जानेवारी महिन्यातील असून अजाणतेपणी ही चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतकंच नाही, तर वनविभागाचा आदर राखत ५ हजार रुपयांचा दंड भरून हे प्रकरण जानेवारीतच मिटवल्याचं त्यांनी सांगितलं. दंड भरून आमदारांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी लोकप्रतिनिधींनीच अशा प्रकारे नियम मोडल्याने ताडोबाच्या शिस्तीवर आता चर्चा रंगू लागली आहे.


