ACB Chandrapur: दुय्यम निबंधक आणि ऑपरेटर ४ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB ने आज एक मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ चे अधिकारी श्री. मोहन चंद्रकांत शेटट्टीवार आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरला ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.


सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या पक्षकाराची भद्रावती तालुक्यातील मालमत्ता होती. या मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी (Registry) करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, चंद्रपूर येथे कागदपत्रे सादर करण्यात आली होती. हे दस्तऐवज नोंदवून देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवार यांनी प्रत्येक रजिस्ट्रीमागे २,००० रुपये याप्रमाणे दोन रजिस्ट्रीचे एकूण ४,००० रुपये लाचेची मागणी केली. परंतु, तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालय गाठून रीतसर तक्रार नोंदवली.


तक्रारीची शहानिशा करून, आज दिनांक १६ जून २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली आणि सापळा रचला. यावेळी आरोपी दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवार यांनी तक्रारदाराकडून ४,००० रुपयांची लाचेची रक्कम मागून ती आपल्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.


ही धडक कारवाई ला.प्र.वि. नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक श्री. अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार यांच्यासह हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर आणि त्यांच्या संपूर्ण सापळा पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.