काळजाचा थरकाप! चिमुरडं रस्त्यावर पडलं, आई-वडील ४०० मीटर पुढे निघून गेले अन्....

Bhairav Diwase
चिमूर:- माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे. ज्या ४ महिन्यांच्या चिमुरड्याला आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवे होते, तोच चिमुरडा आई-वडिलांच्या दारूच्या नशेत चक्क दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला! धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल ४०० मीटरपर्यंत या नशेडू पालकांना आपले बाळ मागे पडल्याची साधी जाणीवही झाली नाही.


ही संतापजनक घटना भिसी बायपास रोडवरील माउली ढाब्याजवळ घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फूलचंद राऊत आणि मीरा राऊत हे दाम्पत्य आपल्या ४ महिन्यांच्या मुलाला आणि अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन दुचाकीने जात होते. हे पती-पत्नी दोघेही दारूच्या नशेत धुंद होते. याच नशेत जात असताना, आईच्या कडेवर असलेले ४ महिन्यांचे बाळ अचानक चालत्या दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले.
पण नशा इतकी टोकाची होती की, बाळ खाली पडल्याचे या दोघांच्याही लक्षात आले नाही. ते तसेच पुढे निघून गेले. साधारण ४०० मीटर पुढे गेल्यानंतर त्यांची दुचाकीही अनियंत्रित होऊन घसरली, ज्यामध्ये हे पती-पत्नी आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी रस्त्यावर पडले. मात्र, तिथे पडल्यावरही आपल्याला आणखी एक लहान बाळ होते आणि ते मागेच सुटले आहे, याचे भान या बेजबाबदार पालकांना नव्हते.


दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या काही सुजाण प्रवाशांची नजर रस्त्यावर पडलेल्या त्या ४ महिन्यांच्या निष्पाप जीवावर पडली. त्यांनी तात्काळ कोणतीही दिरंगाई न करता भिसी पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच भिसीचे ठाणे प्रभारी मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ आणि त्यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सर्वात आधी त्या चिमुरड्याला आपल्या ताब्यात घेतले आणि तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने या चिमुरड्याचे प्राण वाचले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाला सुदैवाने फक्त किरकोळ जखमा झाल्या असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.


खराब रस्ता आणि पालकांची अतिप्रचंड नशा यामुळे हा थरार घडल्याचे सांगण्यात येत आहे. आज जर राहगीरांनी सतर्कता दाखवली नसती आणि पोलिसांनी तत्परता दाखवली नसती, तर कदाचित मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेनंतर आता या बेजबाबदार पालकांविरोधात ड्रंक एंड ड्राईव्ह अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.