Gondpipari News: कडक ऊन, पाऊसही रोखू शकला नाही जनसागर

Bhairav Diwase
वढोलीत दारूबंदीसाठी १० तासांची विशेष ग्रामसभा
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे सुरू करण्यात आलेले दारूचे दुकान कायमस्वरूपी हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लढा अधिक तीव्र केला होता. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने दि. 25 गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.
शुक्रवारी दारू दुकानाच्या विरोधात ग्रामस्थांनी तब्बल दहा तासांचे रस्ता रोको आंदोलन छेडले होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेले आंदोलन शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहिले. या आंदोलनामुळे गोंडपिपरी–मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे ५०० महिला, पुरुष, युवक व नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला.


घटनास्थळी भेट दिल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन पावरा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १४२(२) अन्वये वढोली येथील एस. के. बार अँड रेस्टॉरंट हे दारूचे दुकान २० जून ते ३० जून २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते.
गेल्या सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदी असलेल्या वढोली गावात ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही दारू दुकान सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.


 प्रशासनाने दिलेला तात्पुरता बंदचा आदेश हा अंतिम उपाय नाही असे मानत दारूचे दुकान कायमस्वरूपी हटविण्यात यावे,अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली शेकडोच्या संख्येने चंद्रपूर येथील उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयवर धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले होते.


गुरुवारी पार पडलेल्या ग्रामसभेत संवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, अभिनंदन कांबळे निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग, सि.टी दरोडे दुय्यम निरीक्षक,अतुल भिवगडे दुय्यम निरीक्षक,जगदीश कापटे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, नायब तहसीलदार शेखर वेटे,जीवन प्रधान विस्ताराधिकारी,मंडळ अधिकारी सुकेसनी कांबळे,तलाठी अश्विनी शेळके,मंगेश कराडे पोलिस उपनिरीक्षक,ग्रामसेवक जितेंद्र खोब्रागडे यांची उपस्थिती होती.


विशेष ग्रामसभा सकाळी ११ वाजता सुरू झाली.रात्री ९ पर्यंत सभा चालली. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पावसाची हजेरी लागूनही ग्रामस्थांचा उत्साह कमी झाला नाही. गावातील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली तसेच शेतीचा हंगाम सुरू असतानाही शेतकरी, मजूर व सर्व स्तरातील नागरिकांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामसभेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण १६१४ मतदारांपैकी सुमारे १०४४ मतदारांनी उपस्थित राहून दारू दुकान हटविण्याच्या बाजूने लेखी स्वाक्षरीद्वारे आपले मत नोंदविले.



गावात दारूचे दुकान सुरू होताच ग्रामस्थ झाले आक्रमक....

शुक्रवारी दारू दुकान सुरू झाल्यानंतर ते दुकान बंद करण्यासाठी गोंडपिपरी मूल मार्गावर 12 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.प्रकाशक सरपंच राजेश कवठे,वढोली येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार,रविंद्र कोहपरे,मनिषा कोहपरे,मोहन चुदरी,अखिल कोहपरे,श्रीकांत कानकाटे,नितीन शेकृतवार,भारत धंदरे,घनशाम कोहपरे,रुपेश मेदाडे,सुरेश उपासे,संदीप लाटकर,राहुल देवाडे,शैलेश चौधरी,भगीरथ लांबाडे, गोपी आत्राम,गौरव झरकर,किशोर खरबनकर,रंजीत आभारे,मेघश्याम आभारे,राणी कोहपरे,रोहिणी कवठे,अल्का गेडाम,माया पोरटे,छबू आरेकर या 26 आंदोलन कर्त्यांवर १८९(२),१९०,१२६(२) २२बीएनएस क्रिमिनल अमेडमेंड ॲक्ट १९३२ कलम ७ अंतर्गत गुन्हे नोंद झाले.