Chandrapur News: शिक्षण व्यवस्था ICU मध्ये, पण सरकारला रुग्ण तिथेच मारायचा आहे!

Bhairav Diwase
माजी आमदार सुभाष धोटेंची घणाघाती टीका
चंद्रपूर:- विदर्भातील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि देशातील NEET परीक्षेच्या घोळावरून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "शिक्षण व्यवस्था सध्या आयसीयूमध्ये आहे," अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय. या पत्रकार परिषदेला खासदार प्रतिभा धानोरकर, शहराध्यक्ष शिवा राव, कॉंग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


सुभाष धोटे यांनी २००९ सालच्या आठवणींना उजाळा दिला. जेव्हा अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विजय वडेट्टीवार आणि विदर्भातील अनेक आमदारांनी स्वतंत्र 'विदर्भ कॅडर'ची मागणी केली होती. अशोक चव्हाण साहेबांनी तेव्हाच्या अर्थसंकल्पात पुढील वर्षी 'विदर्भ कॅडर' तयार करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र, पुढील वर्षी चव्हाण साहेब मुख्यमंत्री पदावरून गेले आणि तो विषय तसाच बाजूला राहिला. विदर्भातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी 'विदर्भ कॅडर' आणि MPSC च्या धर्तीवर 'विदर्भ प्रदेश निवड समिती' स्थापन झालीच पाहिजे!


देशातील शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर बोलताना सुभाष धोटे प्रचंड आक्रमक झाले. NEET परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवरून त्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला.

शिक्षण व्यवस्था आयसीयू मध्ये आहेच आहे. परंतु आयसीयू मध्ये भरती केल्यानंतर जो काही उपचार मिळायला हवा, तो मिळत नाहीये. सरकारला असं वाटतंय की हा रुग्ण आयसीयू मध्येच संपून गेला पाहिजे! देशात मुलं आत्महत्या करत आहेत आणि पंतप्रधान रविवारी 'मन की बात', 'चाय पर चर्चा' करत बसतात. पंतप्रधानजी, आता 'इसकी-उसकी चर्चा' बंद करा आणि 'पेपर पे चर्चा' करा!
Tags