Chandrapur News: चंद्रपूर मनपात काँग्रेसचा नवा गटनेता

Bhairav Diwase
वडेट्टीवार गटाला धक्का, धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले नवे गटनेते!
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा नवा गटनेता अखेर ठरला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे सुरेंद्र अडबाले यांची चंद्रपूर मनपाच्या काँग्रेस गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी आज अधिकृतपणे यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.


या निवडीमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि संघर्ष आता अधिक तीव्र आणि उघड झाला आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला होता, पक्षाचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, नेत्यांमधील अंतर्गत हेवेदाव्यांमुळे आणि गटबाजीमुळे काँग्रेसच्या हातात आलेली सत्ता गेली होती.

यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. यापूर्वी हे गटनेतेपद विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडे होते. मात्र, आता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार राजकीय खेळी करत हे पद आपल्या गटाकडे खेचून आणले आहे आणि वडेट्टीवार गटाला मोठा धक्का दिला आहे.