Chandrapur News: नगरसेवकाच्या अतिक्रमण तक्रारीवरून आयुक्तांना विचारला जाब

Bhairav Diwase
उत्तर न देता आयुक्त कार्यालयातून निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक राहुल चौधरी यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षभरापासून १२ वेळा महापालिकेत केली. मात्र, या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. 

एकीकडे सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली जाते, मात्र लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर तक्रारदार कुटुंबीयांनी महापालिका आयुक्त अकनुरी नरेश यांची भेट घेत अतिक्रमण प्रकरणातील कारवाईची माहिती मागितली. मात्र, तक्रारीबाबत प्रश्न विचारण्यात येताच आयुक्तांनी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता कार्यालयातून बाहेर निघून गेले. विशेष म्हणजे तक्रारदार कुटुंबीय आयुक्तांच्या मागोमाग जात त्यांना जाब विचारत असल्याचे दृश्यही पाहायला मिळाले. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नगरसेवकावरील अतिक्रमण तक्रार, त्यावरील वर्षभराची कथित निष्क्रियता आणि त्यानंतर आयुक्तांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तक्रारीवर प्रत्यक्ष कारवाई होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.