Chandrapur News: लेटर बॉम्ब', व्हिप आणि अपात्रतेचे इशारे

Bhairav Diwase
धानोरकर-वडेट्टीवार गटात उघड संघर्ष, नगरसेवक कोंडीत!
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून, दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात टाकण्यात आलेल्या ‘लेटर बॉम्ब’मुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड संभ्रम, धास्ती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने विद्यमान गटनेते बदलण्यासाठी १५ जून रोजी बैठक बोलावली असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी १४ जून रोजी तातडीची बैठक बोलावून पक्षाचा ‘व्हिप’ जारी केला आहे. दोन्ही बाजूंनी कायदेशीर कारवाई तसेच अपात्रतेचे इशारे दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक अक्षरशः कोंडीत सापडले असून, त्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे.


गटनेता बदलाच्या या राजकीय ‘ऑपरेशन’मुळे गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. धानोरकर समर्थक १५ नगरसेवक यवतमाळ येथील एका रिसॉर्टमध्ये रवाना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर धानोरकर गटाकडून काँग्रेस नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा चिकटविण्यात आल्या. या ‘लेटर बॉम्ब’ला प्रत्युत्तर देताना गटनेते राजेश अडूर यांनीही सर्व २७ नगरसेवकांना पत्र पाठवून १४ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही गटांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रांमुळे नगरसेवकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.


राजेश अडूर यांनी जारी केलेल्या पत्रात १५ जून रोजी बोलावण्यात आलेली बैठक बेकायदेशीर व अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्या बैठकीला उपस्थित राहू नये तसेच कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, १४ जून रोजी होणाऱ्या अधिकृत बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या ‘व्हिप’मुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, कोणत्या गटाच्या बैठकीला उपस्थित राहायचे याबाबत ते द्विधा मनःस्थितीत आहेत.विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मनपातील गटनेता निवडीच्या वेळीही असाच संघर्ष उफाळून आला होता.


त्यावेळी हा वाद नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता. अखेर वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांना गटनेतेपद आणि धानोरकर गटाला महापौरपदाच्या उमेदवारीवर समाधान मानावे लागले होते. मात्र अवघ्या चार महिन्यांतच हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.


सध्या दोन्ही गटांचे नेते आपापली राजकीय ताकद पणाला लावत असून, नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या संघर्षात सामान्य नगरसेवक मात्र सर्वाधिक भरडले जात असल्याचे चित्र आहे. आता १४ जूनची गटनेते राजेश अदुर यांनी बोलावलेली तातडीची बैठक आणि १५ जूनला धानोरकर गटाने बोलावलेली बैठक यामधून नेमके काय निष्पन्न होते, हा वाद पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचतो की न्यायालयाची पायरी चढतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Tags