नाशिक:- सावरगावच्या गोतरणे कुटुंबात गुरुवारी सकाळी आनंदाचे वातावरण होते. घरात पाहुण्यांची लगबग, वाढदिवसाची तयारी, गोडधोड जेवणाचा बेत आणि अधिकमासनिमित्त माहेरी आलेल्या लाडक्या लेकीचे कौतुक अशा उत्साही वातावरणाने घर भरून गेले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत कुटुंबाने धोंड्याचे गोड धोड जेवण केले अन् त्यानंतर वाढदिवसासाठी गंगापूर डॅमवर जाण्याचा बेत आखला. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवून ठेवले होते. काही तासांतच आनंदाने न्हाऊन निघालेले हे घर दुःखाच्या सागरात बुडाले आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.
कुटुंबातील मयुरी पवन जाधव (वय २१) ही अधिकमासानिमित्त त्र्यंबकेश्वरहून माहेरी सावरगाव येथे आली होती. विवाहित लेक काही दिवसांसाठी घरी आल्याने आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यातच कुटुंबातील एका तरुणाचा वाढदिवस असल्याने सर्वांनी एकत्र येत दिवस संस्मरणीय करण्याचा बेत आखला होता. जेवणानंतर कुटुंबातील दहा ते बारा सदस्यांनी गंगापूर धरण परिसरात जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
काळाने घातला घाला
आनंदाच्या भरात सर्वजण धरणाकडे रवाना झाले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर काही तरुण-तरुणी बॅकवॉटरमध्ये अंघोळीसाठी उतरले आणि काही क्षणांतच काळाने घाला घातला. पाण्याची खोली आणि खड्यांचा अंदाज न आल्याने मयुरीसह गणेश, साहिल आणि निखिल हे चौघे अडकले. जीव पाण्यात
वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, नियतीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सकाळी वाढदिवसासाठी सजलेले घर सायंकाळी शोकमग्न झाले होते.
आई-वडिलांचा आक्रोश
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा गजर करणाऱ्या घरात अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती. एका बाजूला आई-वडिलांचा आक्रोश, तर दुसऱ्या बाजूला भावंडे, नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा बांध फुटला होता. मृतदेहांवरून हात फिरवत अनेकजण रडत होते. महिला नातेवाइकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या, तर अनेकांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.
रूपालीचे प्रसंगावधान, डोळ्यासमोर चौघे बुडाले
पाण्याच्या विळख्यात सापडलेल्या चौघांची जिवासाठी धडपड सुरू असताना रूपालीने त्यांना वाचविण्यासाठी दोन पावले पुढे आली. मात्र, खोल पाणी व गाळ पाहता तिने प्रसंगावधान राखले. मित्र-नातेवाइकांना वाचविण्यासाठी पुढे जाण्याऐवजी तिने मदतीसाठी आरडाओरड केली. रूपालीच्या आर्त हाका ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. तोपर्यंत चौघेही पाण्याखाली गेले.


