ईव्ही बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल!
चंद्रपूर:- चंद्रपूर आगार एसटी वर्कशॉप परिसरातील परिवहन कार्यालयासमोर ईव्ही बस चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. 'दादा ग्रीन ई-मोबिलिटी एलएलपी' कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या चालकांनी प्रशासनाविरोधात आणि कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ठिय्या मांडला आहे. मागील दीड वर्षांपासून हक्काच्या पगारवाढीसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी मागणी करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने चालकांनी आज संपाचे हत्यार उपसले आहे. याचा थेट फटका चंद्रपूरच्या सामान्य प्रवाशांना बसत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत एकही ईव्ही बस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
चंद्रपूरच्या तुकुम रोडवरील एसटी वर्कशॉप परिसर आज चालकांचे आंदोलन सुरू आहे. 'दादा ग्रीन ई-मोबिलिटी' या गुजरातस्थित कंपनी अंतर्गत चंद्रपूर आगारात चालक म्हणून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. महागाईच्या काळात केवळ आश्वासनं देणाऱ्या एचआर (HR) आणि फिल्ड मॅनेजरच्या भूमिकेवर चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यामध्ये २६ दिवसांचा मासिक पगार २७,००० रुपये करणे, साप्ताहिक रजेचे पैसे मिळणे, वाढत्या महागाईनुसार दरवर्षी वेतनवाढ लागू करणे, आणि सणासुदीला दिवाळी बोनस देणे या आर्थिक मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच, कामावर असताना अपघात झाल्यास कंपनीने कायदेशीर संरक्षण व वकिलाचा खर्च उचलणे, चालकांच्या कुटुंबाला 'ESICS' अंतर्गत वैद्यकीय उपचार मिळणे आणि चालकांवर लावला जाणारा १५,००० रुपयांचा अन्यायकारक दंड कमी करून तो २५०० रुपये करणे, या मागण्यांवर चालक ठाम आहेत.
आम्ही गेल्या दीड वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देत आहोत. पण आजच्या महागाईत आमचा पगार घर चालवण्याइतकाही नाही. आम्ही वारंवार आगार प्रमुख आणि एचआर मॅनेजरला निवेदने दिली, पण फक्त पोकळ आश्वासने मिळाली. वरून आम्हाला कामावरून काढण्याची धमकी दिली जातेय. जोपर्यंत लेखी पगारवाढ मिळत नाही, तोपर्यंत एकही बस आगाराबाहेर निघणार नाही. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


