चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आता थेट चव्हाट्यावर आली आहे. सत्तेच्या अगदी जवळ जाऊनही केवळ अंतर्गत वादामुळे मनपा गमावलेल्या काँग्रेसमध्ये आता गटनेतेपदावरून 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील सुप्त संघर्षामुळे आता थेट नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे.
चंद्रपूर मनपातील गटनेता बदलण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. सध्या मनपात काँग्रेसचे राजेश अडूर हे गटनेते आहेत, जे विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे मानले जातात. मात्र, हे गटनेतेपद आपल्या समर्थकाला मिळावे यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. आता या वादाला अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. खासदार धानोरकर यांच्या १५ समर्थकांसह वडेट्टीवार गटाचे ५ नगरसेवक फुटले असून, हे सर्व २० नगरसेवक अज्ञातस्थळी पर्यटनाला रवाना झाले आहेत. धानोरकरांकडे आता संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी गटनेता बदलण्याची पूर्ण तयारी केल्याची जोरदार चर्चा आहे.
दुसरीकडे, धानोरकर गटाच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे वडेट्टीवार गट चांगलाच सावध झाला आहे. आपले उर्वरित नगरसेवक सुरक्षित ठेवण्यासाठी वडेट्टीवार समर्थकांनी तातडीने बैठक घेतली आणि तेही आता 'देवदर्शन'च्या नावाखाली शहराबाहेर रवाना झाले आहेत. सर्वाधिक जागा जिंकूनही या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे काँग्रेसला चंद्रपूर मनपात सत्ता स्थापन करता आली नव्हती, आणि आता विरोधी पक्षात असतानाही हा संघर्ष थांब नाव घेताना दिसत नाहीये.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. "मी दलित समाजाचा असल्यानेच मला या पदावरून हटवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत," असे अडूर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या अंतर्गत वादाला जातीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस हायकमांड यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अंतर्गत वादामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील दरी आता आणखी रुंदावली आहे. गटनेतेपदाची ही लढाई कोण जिंकणार आणि वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


