भद्रावती:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी अवैध दारू तस्करांविरुद्ध मोठी आणि धडक कारवाई केली आहे. नागपूरवरून चंद्रपूरकडे अलिशान कारमधून वाहून नेली जाणारी लाखो रुपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी थरारक पाठलाग करत तब्बल ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
भद्रावती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होणार होती. या माहितीवरून पोलिसांनी भद्रावती टप्पा येथे तातडीने नाकाबंदी लावली.
दरम्यान, संशयित स्विफ्ट कार (MH-04-HF-1208) येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला. भद्रावती पोलीस पथकाने कसलाही विलंब न लावता या गाडीचा थरारक पाठलाग सुरू केला.
पाठलागादरम्यान चालकाने घोडपेठ गावात गाडी डाव्या बाजूच्या वस्तीत वळवली. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता, मौजा घोडपेठ येथील शंकर हेअर सलूनसमोर सदर कार उभी दिसली. गाडीत चालक उपस्थित नव्हता. पोलिसांनी टॉर्चच्या साहाय्याने काचातून आत पाहणी केली असता, त्यात विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
ऑफीसर चॉईस विदेशी दारूचे (१८० मि.ली.) १७२८ निप्पा – किंमत रु. २,९५,४८८/-
ऑफीसर चॉईस विदेशी दारूचे (९० मि.ली.) ४८० निप्पा – किंमत रु. ४१,२८०/-
मारुती सुझुकी स्विफ्ट कार (MH-04-HF-1208) – किंमत रु. ५,००,०००/-
असा एकूण ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. संतोश केदार, पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोश राठोड पो.स्टे. भद्रावती यांनी केली.

