चंद्रपूर बार असोसिएशनचा अभिनव उपक्रम; वेबसाईटचे लोकार्पण व अधिवक्त्यांसाठी मोफत वाय-फाय
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर यांच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीशांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रसंगी न्यायव्यवस्था आणि बार यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
समारंभात मा. अभय लाहोटी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. तसेच मा. व्ही. एम. बन्सोड व मा. शेख मॅडम यांनी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) म्हणून तर मा. पी. एस. मगरे मॅडम यांनी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय मा. आय. ए. शेख मॅडम व मा. एस. झेड. खान मॅडम यांच्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन करण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या मा. सुबोधिनी झनके मॅडम यांचेदेखील यावेळी बार असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन होते. मंचावर उपाध्यक्ष ॲड. अमन मारेकर यांच्यासह नवनियुक्त न्यायाधीश वर्ग उपस्थित होते. सोबतच कार्यक्रमास इतर न्यायाधीश, अधिवक्ते आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात न्यायालय आणि बार यांच्यातील सुसंवाद, परस्पर सहकार्य आणि न्यायदान प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.
याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. अभय लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बार असोसिएशनच्या वतीने सर्व अधिवक्त्यांसाठी मोफत Wi-Fi सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाचे उपस्थित अधिवक्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. अभिजित किन्हीकर यांनी केले तर ॲड. स्वाती समर्थ यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



