चंद्रपूर:- बल्लारपूर शहराध्यक्ष, वकील तथा नगरसेविका ॲड. मेघा भाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चाने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ॲड. मेघा भाले यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली. संबंधित व्हिडिओतील भाषा ही जबाबदार लोकप्रतिनिधीला न शोभणारी असून, यामुळे लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक पदाचा अवमान झाल्याचा दावा भाजपने केला आहे. केवळ पोलिसांत गुन्हा दाखल करणेच नव्हे, तर वकील म्हणूनही त्यांच्या वर्तनाची शासनाने गंभीर दखल घेऊन प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन तत्काळ कारवाई केली नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी महापौर संगीता खांडेकर, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, भाजप जिल्हा महामंत्री नीलम सुरमवार, पोंभूर्णा नगराध्यक्ष सुलभा पिपरे, , छबू वैरागडे, नम्रता ठेमस्कर, वंदना सिंहा, माया उईके, चंद्रकला सोयाम, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री लक्ष्मी सागर व मुग्धा खाडे, नगरसेविका सविता सरकार, शिला चव्हाण, वंदना संतोषवार, कल्पना बगुलकर, जया लोहे, त्रिवेना जगताप, मोनिशा महतव, सुप्रिया सरकार यांची उपस्थिती होती. आता पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

