चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील दीर्घ संघर्षानंतर अखेर धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांनी आज काँग्रेस गटनेते म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदावर अखेर धानोरकर गटाचा दावा कायम राहिला आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेस गटनेतेपदी निवड झाली असून, त्यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले तसेच धानोरकर गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर गटात तीव्र संघर्ष झाला होता. या अंतर्गत वादामुळे संख्याबळ असूनही काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यानंतर गटनेतेपदासाठीही दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत रंगली. सुरुवातीला वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांच्याकडे गटनेतेपद गेले होते. मात्र, नगरसेवकांचे संख्याबळ आपल्या बाजूने वळवत धानोरकर गटाने न्यायालयीन लढाई जिंकली आणि अखेर हे पद आपल्या ताब्यात घेतले.
पदभार स्वीकारल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत, "वडेट्टीवार यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही न्यायालयीन लढाई जिंकून हे पद मिळवले आहे," अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

