Chandrapur News: चंद्रपूर मनपात 'भाजप विरुद्ध भाजप'!

Bhairav Diwase
नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की; नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले!
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत 'भाजप विरुद्ध भाजप' असा अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला असून, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजी आता थेट चव्हाट्यावर आली आहे. मनपाची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपा कार्यालयातच एकमेकांना भिडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा कुठल्या नियमाच्या आधारे रद्द करण्यात आली, असा संतप्त सवाल करत आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. एवढ्यावरच न थांबता, दुसऱ्या दिवशी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. परंतु, हा वाद इथेच थांबला नाही. याच दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार गटाचे नगरसेवक मनपा कार्यालयात पोहोचले आणि दोन्ही गट समोरासमोर आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पाहता पाहता थेट धक्काबुक्कीत झाले!


दोन्ही गटांचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मनपा परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतर्गत धुसफुस इतकी तीव्र होती की वातावरण निवळायला बराच वेळ लागला. या घटनेमुळे चंद्रपूर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार गट आणि किशोर जोरगेवार गट यांच्यातील सत्तेची सुप्त लढाई आता उघडपणे रस्त्यावर आली आहे.


या राड्यानंतर आता चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात दोन्ही बाजूंकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात आणि वरिष्ठ पातळीवरून या गटबाजीवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.