चंद्रपूर:- अंमली पदार्थांच्या अवैध तस्कराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत १ लाख ४४ हजार रुपयांपेक्षा जास्त मुद्देमालासह एका सराईत ड्रग्ज तस्कराला रंगेहात अटक केली आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना, जलनगर वॉर्डातील संशयित आरोपी ललित उर्फ आर्यन बादल कंजर हा त्याच्या जुन्या घरात अवैध विक्रीसाठी 'एमडी' ड्रग्ज घेऊन आल्याची पक्की बातमी गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
माहितीची खात्री पटताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. एन.डी.पी.एस. कायद्यातील तरतुदींनुसार पोलीस अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन, पंचांसह आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी १८.९५ ग्रॅम एमडी (Mephedrone) ड्रग्ज पावडर हस्तगत केली, ज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ९४ हजार ७५० रुपये आहे. यासोबतच आरोपीकडून ५० हजार रुपयांचा 'ओप्पो रेनो १५ ५जी' मोबाईल असा एकूण १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. चंद्रपुरात वाढत्या ड्रग्जच्या तस्कराविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे ड्रग्ज माफियांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

