Chandrapur Fire News : रघुवंशी कॉम्प्लेक्समधील मेडिकल स्टोअरला भीषण आग

Bhairav Diwase
१५ तास उलटूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच! 
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या आझाद बगिच्याजवळील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कॉम्प्लेक्समधील एका मेडिकल स्टोअरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग एवढी भीषण होती की, १५ तास उलटून गेले तरी ती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. Chandrapur fire News 


चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटेच्या सुमारास अचानक स्पार्किंग होऊन आग भडकली. पाहता पाहता या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले. या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकाने असल्याने, आगीच्या प्रचंड ज्वाला आणि पसरलेला काळा धूर यामुळे आजूबाजूच्या इतर दुकानांना मोठा धोका निर्माण झाला. Fire News 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आजूबाजूच्या परिसरात पसरू नये म्हणून अग्निशमन जवानांनी युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू केले. विभाग प्रमुख, उप अग्निशमन अधिकारी, लीडिंग फायरमन, फायरमन आणि वाहन चालक यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरू आहेत. विशेष म्हणजे, धुराचा व आगीचा सामना करण्यासाठी जवानांनी 'नोमेक्स सूट' आणि 'बी. ए. सेट' चा प्रभावी वापर केला. सायंकाळपर्यंत आग विझवण्यासाठी आणि पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरूच होते. Chandrapur 


या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रावार, उपायुक्त राहुल पंचबुद्दे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाहणी केली. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र, आगीमुळे दुकानांचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. Fire Chandrapur 


या संपूर्ण घटनेमुळे चंद्रपूर शहरातील व्यापारी संकुले आणि इमारतींच्या 'फायर ऑडिट'चा अतिशय महत्त्वाचा आणि प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या कागदावर असणारे नियम आणि प्रत्यक्षात असणारी अंमलबजावणी यावर आता सर्वसामान्यांतून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेनंतर तरी प्रशासन इमारतींच्या सुरक्षेबाबत किती कठोर पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. Raghuvanshi complex