वरोरा:- वरोरा तालुक्यातील बोडखा गावात गेल्या पंधरा दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून, या वाघाच्या तीव्र दहशतीमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोडखा व परिसर शिवारात सातत्याने वाघाचा वावर असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये घबराट पसरली आहे. वाघाने गुराखे आणि शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सततच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत, तर मजुरांनीही शेतात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परिणामरीत्या, सध्याच्या हंगामातील महत्त्वाची शेतीची कामे पूर्णपणे प्रभावित झाली असून शेतकरी संकटात सापडले आहेत.
या गंभीर समस्याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक वनविभागाला वारंवार सूचना आणि निवेदने दिली; मात्र विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना किंवा वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्यात आली नाहीत. यामुळे संतप्त झालेला ग्रामस्थांचा रोष अनावर झाला आणि त्यांनी थेट वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांचे घर गाठले.
आमदार देवतळे यांच्या निवासामोर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार करण देवतळे यांनी तातडीने संबंधित वनाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि बोडखा गावातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या कडक सूचना दिल्यात.
प्रशासनाकडून पुढील दोन दिवसांत वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले आणि परतले. मात्र, ठरलेल्या मुदतीत वाघ जेरबंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे.

