ACB Chandrapur: भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीसाठी चंद्रपूर ACB सज्ज

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, यावर्षी ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभरात २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली आहे. हा सप्ताह १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे, नागरिकांमध्ये प्रामाणिकपणाची भावना वाढवणे आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे, हा मुख्य उद्देश आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वेस्थानके तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सॲप, एसएमएस आणि इतर समाजमाध्यमांचाही वापर करण्यात येणार आहे.

शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पैशांची अथवा अन्य कोणत्याही स्वरूपातील लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी दबावाला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी संपर्क क्रमांक:
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर
दूरध्वनी: ०७१७२-२५०२५१
टोल-फ्री क्रमांक: १०६४
मोबाईल: ८३७९९५१०६४
पत्ता: सिव्हिल लाईन, हुतात्मा स्मारकाच्या मागे, वरोरा नाका, चंद्रपूर.

भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक प्रशासनासाठी सत्यनिष्ठा अंगीकारण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी या जनजागृती सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन अनिल जिट्टावार पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी केले आहे.