Nagpur Graduates' Constituency Election : नागपूर पदवीधर निवडणूक : काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी मैदान मारलं!

Bhairav Diwase

नागपूर:-
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठित ठरलेल्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला आहे. चुरशीच्या झालेल्या या लढतीत अभिजीत वंजारी यांनी ३ हजार २७१ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.


कुणाला किती मतं मिळाली? कसा फिरला गेम

निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार. काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंती क्रमाची मिळून एकूण ६७ हजार २३१ मतं मिळाली. तर भाजपच्या सुधाकर कोहळे यांना एकूण ६३ हजार ९६० मते मिळाली. अभिजीत वंजारी यांनी ३ हजार २७१ मतांनी हा विजय सुकर केला.



पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता. पहिल्या पसंतीच्या मोजणीत एकूण १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. त्यानंतर द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरीनंतर सर्वाधिक मते मिळाल्यामुळे अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते वंजारी यांना विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.