Tiger Attack : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

Bhairav Diwase

सिंदेवाही:-
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, वाघाच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे वाघाच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्रुजी मेश्राम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ते शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथील पत्रुजी मेश्राम हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. याचदरम्यान परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली.


विशेष म्हणजे, या परिसरात अवघ्या १५ दिवसांत वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.